लोकसत्ता मधील लेख

यशोगाथा : समीर साने : एका गृहोद्योगाची हनुमानउडी यशोगाथा
भीमाशंकर कठारे, सोमवार, १० मे २०१० संपर्क- ९४२२०९५४७३/ ०२१४३२५३७१७.
महाराष्ट्राचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा होत असताना माझ्या मनात एक उद्योग विचार चमकून गेला. याप्रमाणे आपल्या राज्यात असे किती लघु-मध्यम-गृहोद्योग असतील जे या वर्षी ५० व्या वर्धापन दिनापर्यंत पोहचले असतील. हा विषय सहज म्हणून मी पनवेलचे अगरबत्ती उपासक शिवानंद मणुरे यांच्या यांच्यापुढे काढला. त्यावर त्यांनी पेणचे साने पापडवाले याची महती सांगितली. नाहीतरी पेणचे पापड, पोहे, गणपती प्रसिद्ध आहेतच. मग मी साने यांची उद्यम कुंडली मांडली. त्यांचा ठावठिकाणा शोधला. सानेपाडा, हनुमान आळी, पेण असा निघाला. मणुरे यांनी आधीच सांगितले होते ‘श्री गृहउद्योग’ हे त्यांच्या उद्योगांचे नाव. पार्काच्या गणपतीचे ते भक्त आहेत. पाहावे तर सानेवाडा ठिकाणी साने बंगला. प्रथम दर्शनी कितीतरी बायाबापडय़ा गृह उत्पादने करीत होती. काही ग्राहकांचा माल गोणीबंद होत होता. त्यात एक-दोन ग्राहक दापोली व पुण्याचे होते. एकूण काय हनुमान आळीचे हनुमान लेन झाले नाही. पण साने कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने ‘श्री गृहोद्योची हनुमान उडी’ घेतल्याचे पाहून मला एक दिलासा मिळाला. आणि गृहोद्योग क्षेत्रातल्या होतकरूंना उभारी मिळावी म्हणून ही यशोगाथा. अहोऽ पेणच्या पंचक्रोशीतील, महाराष्ट्रभर पसरलेल्या त्यांच्या ग्राहकांना श्री गृहउद्योग कुठे आहे असे विचारताच आठवून म्हणतील, म्हणजे आपल्याला साने पापडवाले हवेत ना! कित्येक वेळा काय होतं.. सानेकडून आम्हाला पाहिजे तो पाहिजे इतका पापड आदी माल मिळत नाही. तेव्हा आम्ही दुसरीकडून घेतो. पण ग्राहकाला सानेंची चव माहीत असते. सानेंचा माल संपला वाटतं. अशी पुस्ती त्यांचे एक दुकानदार ग्राहकांनी जोडली. अशी ही सानेची पन्नास वर्षे चवीची. अशा या साने पापडवाल्यांची तिसरी पिढी म्हणजे समीर सुरेश साने आणि स्वाती समीर साने हे होत. साने यांच्या गृहोद्योग मालाची यादी पाहिल्यावर त्यात पन्नास-एक प्रकारची उत्पादने दिसतात. त्यात पापड, मिरगुंड, टिकली, कुरडई, सांडगे, पीठ, चटण्या, भाजणी, गोडा मसाला, शेवया, सांडगी मिरची, त्याचे अनेक प्रकार. यावर स्वाती साने म्हणाल्या, ‘आम्ही २२ प्रकारचे पापड करतो. पोहा पापड, ताकातला पोहा पापड हा एक वेगळा प्रकार. पेण म्हटल्यावर पेणचे पोहे आणि गणपती. म्हणून आम्ही पोहा टिकली, पोहा मिरगुंड असे प्रकारही तयार करतो. साधारण ३० महिलांना रोजगार मिळाला असून पापडासाठी काही महिला जॉब वर्कप्रमाणे काम करतात..’ म्हणजे सानेसाहेब तुमच्या श्री गृहउद्योगाला ५० वर्षे होणार आहेत. त्यात साधारण ५० प्रकारचा माल व त्यासाठी सर्व मिळून ५० लोकांना रोजगार मिळतो. ही म्हणजे एक प्रकारे सुवर्णमहोत्सवाची हॅटट्रिकच म्हणाना! अशा या साने पापड उद्योगांची सुरुवात समीर साने यांच्या आजी मनोरमाबाईंनी १९६० मध्ये सुरुवात केली. तशा त्या सुगरण व धडपडय़ा होत्या. घरगुती पदार्थ तयार करण्यात माहीर होत्या. आपल्या मागे काय होते, पुढय़ात काय आहे, यापेक्षा आपल्या स्वत:त काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला काय येते, अशा विचारांनी आपल्या सुग्रणपणाचे हात त्यांनी पापड, सांडगे, कुरडया या पदार्थात गुंतविल्या. याच काळापासून औद्योगिक विकासाला चालना मिळत होती. महिला वर्गही नोकरीसाठी बाहेर पडत होत्या आणि सानेच्या या मालाला पुणे, मुंबई अशा शहरातून मागणी येत राहिली. वाढती मागणी लक्षात घेऊन सुरेश आणि त्यांच्या पत्नी सीमा सानेही या क्षेत्रात उतरल्या.
काही मालाची यादी वाढविली. दरम्यान, समीर साने इलेक्ट्रिकल क्षेत्रात पदविका शिक्षण घेऊन नोकरीस लागले, पण चिरकले नाहीत. घरच्या श्री गृह उद्योग उत्पादनाला त्यांनी आधुनिक यंत्रांची जोड दिली. त्यांच्या पत्नी स्वाती साने बी. कॉम. असल्याने हिशेब, रिटेलिंग दुकान, बाहेरून येणाऱ्या ग्राहकांच्या यादीची पूर्तता अशा कामात त्याही गढून गेल्या. समीर-स्वाती सम उद्योगविचारी ठरल्याने श्री गृहउद्योगाला हनुमान उडी घेणे सोपे झाले असे त्यांचे मित्र आवर्जून सांगतात. पेणच्या पोह्यांची मागणी एवढी की, तो पुरवठा करता येतो का? या प्रश्नाला उत्तर देताना समीर साने थोडे हताश होऊन म्हणाले.. ‘पूर्वी पोहे करणाऱ्या बऱ्याच भट्टय़ा पेणमध्ये होत्या. सभोवताली उद्योग वाढले. त्यात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हल्लीचे तरु शेतात काम करीत नाहीत. तेव्हा तांदूळ उत्पादन घटले. कित्येक तरुण मुंबई-पुण्याकडे धावले. तेव्हा पोहे करण्याच्या प्रक्रियेतील भट्टीजवळ उभे राहून काम करण्यास माणसे मिळत नाहीत. आजच्या तरुणांना कष्टांची कामे नको आहेत. म्हणून आम्ही मिळेल तेवढे पोहे रोह्याहून आणि बरेच पोहे गुजराथच्या नवसारीहून मागवतो.’ म्हणजे सानेसाहेब नवसारीचे पोहे पेणचे पोहे म्हणून विकले जातात. आता याला काय म्हणावं! म्हणून तर साने यांनी आपल्या ‘श्री’मध्ये ग्राईंडिंग, ड्रायर, मिक्सर अशा उपकरणे, यंत्राची संख्या वाढविली. स्वत: इलेक्ट्रिशियन असल्याने त्यांची देखभालही ते करू शकतात. अडचणी, व्यवस्थापन, खर्च आदीचा विचार समीर-स्वाती मिळून निर्णय घेतात. म्हणून पेणमध्ये हे दोघे उद्यमी जोडपे म्हणून ओळखले जाते. पेणच्या विकासाविषयी बोलताना समीर साने म्हणाले, ‘वास्तविक पाहता पेणच्या जवळ मुंबई, ठाणे, वाशी, पुणे अशी औद्योगिक शहरे आहेत. या दृष्टीने इथे औद्योगिक वसाहत हवी होती. तसेच पेणच्या आसपासच्या खेडूतांना धड वीज नाही, पाणी नाही, पण इथे बांधल्या जाणाऱ्या बाळगंगा नदीवरचे धरण म्हणजे मुंबईच्या पाण्याची सोय असे समजते. शहरे फुगवून फुगवून किती फुगवणार, त्यापेक्षा ग्रामीण भागात मूलभूत सोयी देऊन केल्यास इथला तरुणवर्गही आपल्या गावी स्वावलंबी होऊ शकतो. तसे प्रशिक्षण तशी मानसिकता घडविणे ही काळाची गरज ठरते. असा उद्यमविचार पेण परिसरात राबविल्यास निश्चितपणे तो यशस्वी होईल असे मला वाटते.’ श्री गृहउद्योग तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला. यशस्वी ठरला. या प्रीत्यर्थ श्री व सौ. साने यांचे अभिनंदन.