About Us - Shree Gruh Udyog
 

आमच्याबद्दल

या साने पापड उद्योगांची सुरुवात समीर साने यांच्या आजी मनोरमाबाईंनी १९६० मध्ये सुरुवात केली. तशा त्या सुगरण व धडपडय़ा होत्या. घरगुती पदार्थ तयार करण्यात माहीर होत्या. आपल्या मागे काय होते, पुढय़ात काय आहे, यापेक्षा आपल्या स्वत:त काय आहे, आपण काय करू शकतो, आपल्याला काय येते, अशा विचारांनी आपल्या सुग्रणपणाचे हात त्यांनी पापड, सांडगे, कुरडया या पदार्थात गुंतविल्या. याच काळापासून औद्योगिक विकासाला चालना मिळत होती. महिला वर्गही नोकरीसाठी बाहेर पडत होत्या आणि सानेच्या या मालाला पुणे, मुंबई अशा शहरातून मागणी येत राहिली. वाढती मागणी लक्षात घेऊन सुरेश आणि त्यांच्या पत्नी सीमा सानेही या क्षेत्रात उतरल्या. काही मालाची यादी वाढविली.

तिसरी पिढी म्हणजे समीर सुरेश साने आणि स्वाती समीर साने हे होत.
समीर साने इलेक्ट्रिकल क्षेत्रात पदविका शिक्षण घेऊन नोकरीस लागले, पण नंतर त्यांनी घरच्या श्री गृह उद्योग उत्पादनाला आधुनिक यंत्रांची जोड दिली. त्यांच्या पत्नी स्वाती साने बी. कॉम. असल्याने हिशेब, रिटेलिंग दुकान, बाहेरून येणाऱ्या ग्राहकांच्या यादीची पूर्तता अशा कामात त्याही गढून गेल्या.

समीर साने
‘पूर्वी पोहे करणाऱ्या बऱ्याच भट्टय़ा पेणमध्ये होत्या. सभोवताली उद्योग वाढले. त्यात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हल्लीचे तरु शेतात काम करीत नाहीत. तेव्हा तांदूळ उत्पादन घटले. कित्येक तरुण मुंबई-पुण्याकडे धावले. तेव्हा पोहे करण्याच्या प्रक्रियेतील भट्टीजवळ उभे राहून काम करण्यास माणसे मिळत नाहीत. आजच्या तरुणांना कष्टांची कामे नको आहेत. म्हणून आम्ही मिळेल तेवढे पोहे रोह्याहून आणि बरेच पोहे गुजराथच्या नवसारीहून मागवतो.’
‘वास्तविक पाहता पेणच्या जवळ मुंबई, ठाणे, वाशी, पुणे अशी औद्योगिक शहरे आहेत. या दृष्टीने इथे औद्योगिक वसाहत हवी होती. तसेच पेणच्या आसपासच्या खेडूतांना धड वीज नाही, पाणी नाही, पण इथे बांधल्या जाणाऱ्या बाळगंगा नदीवरचे धरण म्हणजे मुंबईच्या पाण्याची सोय असे समजते.
शहरे फुगवून फुगवून किती फुगवणार,त्यापेक्षा ग्रामीण भागात मूलभूत सोयी देऊन केल्यास इथला तरुणवर्गही आपल्या गावी स्वावलंबी होऊ शकतो. तसे प्रशिक्षण तशी मानसिकता घडविणे ही काळाची गरज ठरते. असा उद्यमविचार पेण परिसरात राबविल्यास निश्चितपणे तो यशस्वी होईल असे मला वाटते.’

स्वाती साने
‘आम्ही २२ प्रकारचे पापड करतो. पोहा पापड, ताकातला पोहा पापड हा एक वेगळा प्रकार. पेण म्हटल्यावर पेणचे पोहे आणि गणपती. म्हणून आम्ही पोहा टिकली, पोहा मिरगुंड असे प्रकारही तयार करतो. साधारण ३० महिलांना रोजगार मिळाला असून पापडासाठी काही महिला जॉब वर्कप्रमाणे काम करतात..’
श्री साने यांनी आपल्या कारखान्यामध्ये ग्राईंडिंग, ड्रायर, मिक्सर अशा उपकरणे, यंत्राची संख्या वाढविली. स्वत: इलेक्ट्रिशियन असल्याने त्यांची देखभालही ते करू शकतात. अडचणी, व्यवस्थापन, खर्च आदीचा विचार समीर-स्वाती मिळून निर्णय घेतात. साने यांच्या गृहोद्योग मालाची यादी पाहिल्यावर त्यात पन्नास-एक प्रकारची उत्पादने दिसतात. त्यात पापड, मिरगुंड, टिकली, कुरडई, सांडगे, पीठ, चटण्या, भाजणी, गोडा मसाला, शेवया, सांडगी मिरची, त्याचे अनेक प्रकार.

समीर साने


स्वाती साने